राज्यातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, ५० टक्के क्षमतेनं आजपासून सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड नियमांचं पालन करून राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागा, अम्युझमेंट पार्क्स उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के क्षमतेनं ही ठिकाणं आजपासून खुली होणार आहेत.

राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, सर्व ठिकाणी मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर,  सुरक्षित अंतर पाळणे तसंच थर्मल तपासणी बंधनकारक आहे. केवळ निम्म्या क्षमतेनं प्रेक्षकांना परवानगी असेल आणि परिसरात कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी संबंधितांना घ्यावी लागेल. प्रेक्षकांनी मध्यंतरात बाहेर जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाट्यगृह आणि बंदिस्त जागांमधील कार्यक्रमांसाठी बालकलाकारांव्यतिरिक्त इतर  कलाकार, कर्मचारी आणि प्रेक्षकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेलं आवश्यक राहील. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील. तसंच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही. कलाकारांच्या रंगभूषा, केशभूषेसाठी तसंच ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम आखण्यात आले आहेत. 

सर्व ठिकाणी सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान तसंच सापेक्ष आर्द्रता ४० ते ७० टक्क्यांच्या दरम्यान ठेवावी लागणार आहे. सर्वत्र शक्य होईल तेवढी ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असावी, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे. नाट्य आणि चित्रपटगृह आजपासून सुरु होत असल्याबद्दल दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

अम्युझमेंट पार्क्समध्ये सध्या केवळ कोरड्या राईड्सनाच परवानगी देण्यात आली आहे. भारतीय सिनेमांचा इतिहास दर्शवणारं मुंबईतलं पेडर रोडवरचं फिल्म डिविजनच्या आवारातलं ‘ नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा’ हे संग्रहालयही आजपासून प्रेक्षकांसाठी पुन्हा खुलं होत आहे. सोमवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस हे संग्रहालय खुलं असेल.