ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं - आरोग्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य विभागाच्या ‘क’ गटासाठी आलेल्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत झालेल्या बचतीतून विभागीय पातळीवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं नियोजन केलं जात असून अशी रुग्णालयं उभारली गेली तर कर्करुग्णांना आधार मिळेल आणि त्यांना सर्व प्रकारचे उपचार वेळेत मिळतील, असंही टोपे यांनी सांगितलं. ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. न्यासा संस्थेशी योग्य समन्वय साधून परीक्षा चांगल्या पार पडाव्या याबाबत योग्य नियोजन केल्याचं टोपे यांनी सांगितलं.