राज्यातील महाविद्यालयं आजपासून सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातली महाविद्यालयं आज पासून पुन्हा सुरू झाली. अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महाविद्यालय पुन्हा प्रत्यक्ष सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील सर्व महाविदयालयांसोबत वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिला आहे. औरंगाबादमध्येही उत्साहात महाविद्यालयं सुरु झाली. मात्र काही महाविद्यालयांची ऑनलाईन परीक्षा सुरु असल्यानं दिवाळीनंतर प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याचा निर्णय या महाविद्यालयांनी घेतला आहे. पन्नास टक्के उपस्थितीची मर्यादा यासाठी आहे. कोविड प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही हाच नियम आहे. लसीची एक मात्रा अथवा लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणाची मुभा आहे.