पंतप्रधानांच्या हस्ते ७ संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून, देशात आधुनिक संरक्षण उद्योगाचा विकास करून,देशाला जगातील मोठी संरक्षण ताकद बनवण्याचं ध्येय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. देशातील ४१ शस्त्रात्र निर्मिती कंपन्यांचं ७ नवीन संरक्षण कंपन्यांमध्ये रुपांतर करण्यात आलं असून, त्याचा लोकार्पण सोहळा काल विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच संरक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे; असं ते म्हणाले. या ७ राष्ट्रीय कंपन्यांमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल तसेच संरक्षण क्षेत्रात आधुनिकता, प्रगती आणि आत्मनिर्भरता आणण्याचे सरकारचे प्रयत्न अधिक बळकट होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.या कंपन्यांकडे सध्या ६५ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची मागणी नोंदवण्यात आली आहे; हेच त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामाचं द्योतक आहे, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन आणि निर्यातीमध्ये भारताला अव्वल स्थान मिळवून देण्याचा यामागे उद्देश असल्याच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितल. या ७ कंपन्यांमध्ये, नागपूर इथल्या यंत्र इंडिया कंपनीचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमासाठी नागपूर इथ कंपनीत उपस्थित होते.