तांदुळ, मका तसेच इतर धान्यापासून इथेनॉल तयार करायला परवानगी देणार - नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे तांदुळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर इथं आयोजित एका कार्य़क्रमात बोलत होते. धान्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी आतापर्यंत साडेचारशे लोकांनी अर्ज केले आहेत. आपल्या देशात गेल्या वर्षीचं इथेनॉलच उत्पादन केवळ 465 कोटी लीटर होतं. आपल्याला जर वाहनांच्या पेट्रोलमध्ये जर किमान 20 टक्के इथेनॉल टाकायचं असेल तर देशाची इथेनॉलची गरज साडेसोळाशे कोटी लीटरची आहे. त्यामुळे जितकं इथेनॉल तयार केल जाईल तेवढं सरकार विकत घेईल. अशी घोषणाही त्यांनी केली. हे जे इथेनॉल इंधन आहे ते पेट्रोलपेक्षा चांगलं असून ब्राझिलमधे ८५ टक्के वाहनांमध्ये इथेनॉलच्या गाड्या वापरल्या जात असल्याचंही ते म्हणाले. ब्राझीलमध्ये जगातल्या काही आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांच्या गाड्या वापरल्या जात असून इथेनॉलचा वापर शंभर टक्के झालं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. देशात अन्नधान्याचं अतिरिक्त उत्पादन आहे. शेतकरी संघटनेच्या काही नेत्यांनी आपल्याला देशातलं पिक धोरण बदलायला हवं अशी मागणी केली असून ऊसाच्या शेतात आता तेलबिया लावल्या पाहिजेत असं आवाहनही त्यांनी केलं. जगात कोणत्या गोष्टीचं उत्पादन अधिक आहे आणि कोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे पाहून पिक धोरणं ठरवलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-चेन्नई असा हा रस्ता असून तब्बल ५० हजार कोटी रूपये खर्च या रस्त्यासाठी येणार आहे, असं गडकरी यांनी स्पष्ट केली. या रस्त्यासाठी ११५० हेक्टर भूसंपादन करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. गडकरी यांनी या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून महामार्गाच्या बाजूला राज्य सरकारनं जागा दिली तर अन्य सुविधा उभारू, असंही सांगितलं. गडकरी यांनी यापुढे साखरेचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा अति झाल्यानं नव्या कारखान्यांना परवानगी देता य़ेणार नाही, असही त्यांनी सांगितलं.