इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काल भारतानं आपला दुसरा डाव बिनबाद ४३ वरून पुढे सुरु केला. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी ८३ धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत रोहित शर्मानं दुसऱ्या गड्यासाठी १५३ धावांची भागिदारी केली. या दोघांनाही इंग्लडच्या रॉबिनसन यानं एकाच षटकात बाद केलं.

रोहितनं १२७ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधे रोहितचं परदेशातलं हे पहिलंच शतक ठरलं आहे. पुजारानं ६१ धावा केल्या. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं ३ गडी बाद २७० धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावातली पिछाडी भरून काढत, भारतानं दुसऱ्या डावात १७१ धावांची आघाडी मिळवली आहे. सध्या कर्णधार विराट कोहली २२ तर रविंद्र जडेजा ९ धावां करून खेळपट्टीवर आहेत.