युवा पिढीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्यासाठी पॅरालम्पियन्सनी प्रोत्साहन द्यावे – नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमधे १९ पदकांची कमाई करुन इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या खेळाडूंनी आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि मेहनतीच्या जोरावर केवळ खेळात यश मिळवलं आहे असं नाही तर या गुणांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. खेळांपल्याड जाऊन विविध क्षेत्रात देशाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी इतरांना प्रेरित करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. या कार्यात सरकार त्यांच्या पाठीशी राहील असं ते म्हणाले. पॅरालिंपिक मधे देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ५४ खेळाडूंशी मोदी यांनी गेल्या आठवड्यात संवाद साधला. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीची चित्रफीत त्यांनी प्रसिद्ध केली आहे. या खेळाडूंचं प्रेरक कार्य स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात महत्त्वाचं योगदान ठरेल असं मोदी यांनी म्हटलं आहे.