औरंगाबाद जिल्ह्यात विविध विकास कामं वेगानं पूर्ण करा - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं सादरीकरण काल त्यांच्यासमोर करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. राज्याच्या संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या संत श्री एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या १४४ शाळांच्या इमारतींची पुनर्बांधणी आणि दुरूस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणाची ३८२ कोटी रुपयांची आणि शहरातल्या विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाची ३१७ कोटी २२ लाख रूपयांची कामं महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगानं करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.