अमेरिका दौरा म्हणजे दोन्ही देशांमधले सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय संबंध आणखी वृद्धींगत करण्यासाठीचं पुढचं पाऊल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका दौरा म्हणजे दोन्ही देशांमधले सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय संबंध आणखी वृद्धींगत करण्यासाठीचं पुढचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी आज केलं. या दौऱ्यात जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशां बरोबरचे संबंधही आणखी दृढ करण्याची संधी प्रप्त झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव, भारत-प्रशांत क्षेत्र, दहशतवाद, पर्यावरण बदल या विषयांवरही ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या प्रधानमंत्र्यांबरोबर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शिवाय उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या बरोबर देखील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता मोदी यांनी वर्तवली. अमेरिका दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.मूलतत्ववाद आणि दहशतवाद यासह अफगाणिस्तानमधल्या घडामोडी, याबाबत मार्ग काढण्याविषयी सुद्धा दोन्हीं नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. क्वाड नेत्यांच्या प्रत्यक्ष बैठकीतही प्रधानमंत्री उपस्थित राहतील. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या ७६ व्या सत्रात एका उच्चस्तरीय परिसंवादात प्रधानमंत्री बोलणार आहेत.