साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लिटफेस्ट अर्थात साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न झाले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत ७ व्या जागतिक साहित्य महोत्सवाचं उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. लिटफेस्ट सामान्यतः इंग्रजी भाषेतून होतात. इंग्रजी भाषेत उत्तम साहित्य आहे आणि साहित्यिक आहेत, याबाबत दुमत नाही. परंतु हिंदी, बंगाली, मराठी यांसह भारतीय भाषांमध्ये अतिशय समृद्ध साहित्य आहे. महाराष्ट्रात आल्यावर इथलं साहित्य किती संपन्न आहे हे समजलं, असं राज्यपाल म्हणाले. या तीन दिवसीय साहित्य महोत्सवाचं आयोजन एशियन अकादमी ऑफ आर्ट, आणि इंटरनॅशनल चेंबर ऑफ मिडिया एंड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीनं केलं आहे.