अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

 

मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

श्री. भुसे यांनी आज आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी आयआयटीच्या रुरल टेक्नॉलॉजी अँक्शन ग्रुप, सितारा ग्रुपच्या प्राध्यापक, संशोधक यांच्याशी संवाद साधला. या ग्रुपच्या सहाय्याने शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतली, प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आयआयटी, मुंबई  येथील जलविहार सभागृह येथे ही बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) संचालक इंद्रा मालो,  आयआयटीचे संचालक डॉ. सुभाषिश चौधरी, प्रा. आनंद राव आदी उपस्थित होते.

श्री. भुसे यांनी सांगितले की, राज्यातील  शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता यावी यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.  अल्पभूधारक  शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील आणि निविष्ठा खर्चात कपात होईल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा. राज्यातील विविध भागांत अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या अनुभवातून विविध तंत्रज्ञान, यंत्रसामग्री विकसित करतात. त्यांच्या संशोधनाला तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यासाठी आयआयटी आणि कृषी महाविद्यालयांनी एकत्रित यावे, असे आवाहनही श्री. भुसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गणेश पाटील, कृषी संचालक (गुणवत्ता) दिलीप झेंडे,  संचालक ( विस्तार आणि शिक्षण) विकास पाटील, पोकराच्या मेघना केळकर, विजय कोळेकर, डॉ. मिलिंद राणे, डॉ. सतिश अग्निहोत्री, डॉ. बकुळ राव आदी उपस्थित होते.                                              

कृषी विभाग-आयआयटी करणार समस्यांवर एकत्रित संशोधन

आयआयटी मध्ये संशोधन करणारे विद्यार्थी राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहेत. यासाठी राज्य शासन, कृषी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, असे आयआयटीच्या आनंद राव यांनी सांगितले. या कल्पनेवर आयआयटी आणि कृषी विभाग यांनी एकत्र येऊन आराखडा तयार करावा, अशी सूचना श्री. भुसे यांनी केली. कृषी विभाग-आयआयटी यांच्या सहकार्यातून शेतीच्या समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी प्रथमच प्रयत्न होत आहेत. यातून समस्यांवर निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वासही श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

आयआयटीला भेट देणारे पहिलेच कृषिमंत्री

मुंबई येथे राज्याच्या कृषिमंत्री  यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्रा. आनंद राव यांनी सांगितले. आयआयटी मधील संशोधनाचा शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा विचार कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी आमच्याकडे व्यक्त केला. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कृषी विभागासोबत काम करण्यासाठी निश्चितच आनंद होईल, असेही त्यांनी सांगितले.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image