शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातले खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातले उमेश खोसे यांचा यात समावेश आहे. प्रत्येक मुलाची क्षमता, बुद्धिमत्ता, मानसिकता, सामाजिक पार्श्वभूमी आणि वातावरण या सर्वांचा विचार शिक्षकानं करायला हवा असं आवाहन राष्ट्रपतींनी याप्रसंगी बोलताना केलं. मुलांमध्ये घटनात्मक मूल्यं आणि नागरिकांची मूलभूत कर्त्तव्यं बिंबवणारी शिक्षण व्यवस्था हवी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. दूरदृश्य पद्धतीनं झालेल्या या सोहोळ्याला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या, ज्ञानवंत, गुणवंत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवणाऱ्या राज्यातल्या शिक्षक बंधू-भगिनींचा महाराष्ट्राला अभिमान आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.