राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा राज्यसरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरु करायला राज्यसरकारनं मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं सकारात्मक अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याच्यात चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायाल परवानगी देण्यात आली आहे. शाळासंबधातले सर्व अधिकार हे स्थानिक प्रशासनाकडे असणार आहेत, असंही गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असून कोणत्याही विद्यार्थ्याला उपस्थितीची सक्ती नसेल. प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी कसं जोडता येईल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. तसंच शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसणार आहे. मात्र, आश्रम शाळा सुरु करण्याबाबत परवानगी दिली नसून ऑनलाईन वर्ग सुरुच असणार आहेत, असंही गायकवाड यांनी सांगितले आहे.