औरंगाबादमधे आयोजित मंथन या राष्ट्रीय बँक परिषदेचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजना, आधार आणि मोबाईल या जॅम ट्रिनिटीमुळे देशातल्या गरीबांचं जीवनमान उंचावण्यात मदत मिळत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज औरंगाबाद इथं मंथन या राष्ट्रीय बँक परिषदेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर बोलत होत्या.

जनधन योजनेच्या माध्यमातून देशातल्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या सर्व कुटुंबांचं बँक खातं, कोणताही भेदभाव न करता सुरु केलं जात आहे. खातेदारांची ओळख कायम रहावी म्हणून आधार कार्डचा उपयोग होत आहे, तर खात्यावर होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती मोबाईलवर संबंधितांना दिली जात आहे. या जॅम ट्रिनिटीमुळे थेट लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय मदत देता येते.सर्व जनधन खाती आधारक्रमांकाशी संलग्न केली असल्यानं खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवणं सुलभ झालयं. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आपोआप आळा बसला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाला बळकटी मिळाली आहे, असं त्या म्हणाल्या.

अलिकडेच वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खातं सुरु करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना  केलं. आतापर्यंत ४३ कोटीपेक्षा जास्त बँकखाती सुरु झाली असून ८० ते ९० टक्के लोकांची बँक खाती सुरु करण्याचं काम पूर्ण झालं आहे. केवळ आकांक्षित जिल्ह्यांमधे हे काम बाकी आहे, असं कराड यांनी सांगितलं.