सोन्याची देवाणघेवाण आणि स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी सेबीची स्वतंत्र नियमावली निश्चित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीनं स्वतंत्र गोल्ड एक्सचेंज आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी स्वतंत्र नियमावली निश्चित केली आहे. सेबीच्या काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ही नियमावली निश्चित करण्यात आली. या बैठकीत सूचीबद्ध इक्विटी समभागांना सूचीमधून हटविण्यासाठीच्या सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक रिसीट्सच्या स्वरूपात सोन्याचा व्यापार करण्यासाठी गोल्ड एक्सचेंजची स्थापना करण्यात येत असून त्यामुळे सोन्याचा देशांतर्गत दर पारदर्शी पद्धतीनं कळणं शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सला ई जी आर म्हटलं जाणार असून अन्य समभागाप्रमाणे त्याचा व्यापार आणि अन्य व्यावसायिक उलाढालीही शक्य होणार आहेत.