मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन थेरगाव येथे उत्साहात साजरा

 

पिंपरी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन जिजाऊ हॉल सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे आंनदी वातावरणात एकदम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघाचे गजानन आढाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठा सेवा संघाविषयी बोलताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख म्हणाले की, मराठा समाजाच्या सामाजिक जाणिवा अधिक बळकट करुन वैचारिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या कामाचा डोंगर उभ्या करणाऱ्या मराठा सेवा संघाचा आज एकत्तिसाव्वा वर्धापन दिन साजरा करतांना आनंद होत आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले हा प्रश्न विचारायची आज कोणत्याही सुज्ञ समाज बांधवाला गरज पडत नाही हे या संघटनेचे यश आहे. माजलेल्या काटेरी झुडपांच्या भूमीची मशागत करून तिला विचारांचं भरघोस पीक मिळवण्याइतपत सुपीक बनविण्याचे अवघड कार्य मराठा सेवा संघाने करून दाखविले आहे.

समाजातून वेळ, बुद्धी, कौशल्य, श्रम तसेच पैसा हे पंचदान गोळा करून समाजाला धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता व प्रचार-प्रसार माध्यमसत्ता या पंचसत्ता हस्तगत करण्यासाठी दिशा देण्याचे काम मराठा सेवा संघ अॅड पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
समाजातील वाईट विचारांचे अनिष्ठ चालीरीतींचे तसेच व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करून त्याच समाजाला वाचण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे आणि विचार करण्याचे विधायक व्यसन लावण्याचे काम सेवा संघाने केले आहे.

येथून पुढचा प्रवास करत असताना मराठा सेवा संघ दिर्घकाळ परिणामकारक ठरणारी रचनात्मक कामे हातात घेऊन महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवण्याचे काम मराठा सेवा संघ नक्कीच करेल.अशा भावना यावेळी व्यक्त केल्या यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटन ज्ञानदेव लोभे, अपना वतन संघटनेचे शहर कार्याध्यक्ष हमीद शेख, राजश्री शिरवळकर, संगिता शहा, अर्चना मेंगडे, दिपाली डिकले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केले.