महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करावी - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते काल यासंदर्भात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकीनाका इथं एका महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, या प्रकरणी एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावं, असं त्यांनी सांगितलं. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावं, जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही.

उद्यापासून तातडीनं या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. एक सुरक्षित शहर अशी मुंबईची प्रतिमा आहे. या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. साकीनाक्याच्या घटनेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्याठिकाणी पोहचून, जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं, कुठेही वेळ दवडला नाही, तसंच तातडीनं संशयिताला पकडलं, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. महिलांची वर्दळ असलेली ठिकाणं लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथकन स्थापन करावीत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं रस्त्यावरच्या निराश्रित आणि एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावं, आणि अशा ठिकाणीही पोलिसांनी बारकाईनं नजर ठेवावी, गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातले कॅमेरे  शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.