“पोषण माह” अंतर्गत मुंबईत उद्या “पोषण जागरुकता अभियान” कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : “पोषण माह” अंतर्गत समाजातल्या विविध घटकांमध्ये, “पोषण जागरुकता अभियान” (पोषण जागृती अभियान) कार्यक्रमांची एक मालिका उद्या मुंबईत विविध ठिकाणी आयोजित केली जात आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय, तसंच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय संयुक्तपणे हे कार्यक्रम आयोजित करत आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

पोषण जागरूकता कार्यक्रम अंजुमन-इ -इस्लाम गर्ल्स स्कूल, आणि महात्मा गांधी सेवा मंदिर हॉल-वांद्रे पश्चिम; अवर लेडी ऑफ गुड कौन्सेल हायस्कूल- शीव; आणि द दादर अथॉर्नन इन्स्टिट्यूट- दादर, इथं आयोजित केले आहेत.

ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, पारशी, जैन आणि शीख या अल्पसंख्य समाजातल्या, तसंच गरीब आणि मागास भागातल्या महिला त्यांच्या कुटुंबियांसह या कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यांना पोषणाच्या फायद्यांविषयी माहिती दिली जाईल, आणि पोषण किटचं वाटपही केलं जाणार आहे.

त्याआधी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी धारावी इथल्या एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला भेट देऊन, आयसीडीएस लाभार्थी आणि स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करणार. तसंच या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या नागरिकांच्या घरीही त्या जाणार आहेत.