नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता; शेतीशी निगडीत जोड धंद्यातून उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत; शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण झालं; त्यावेळी ते बोलत होते. हवामान बदल आणि कुपोषण या समस्यांचा सामना करण्याच्या दृष्टीनं ही वाणं भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केली आहेत. यात चणे, सोयाबिन, तांदूळ, गहू, मका, बाजरी, पशुखाद्य म्हणून वापरली जाणारी धान्यं, डाळी यांचा समावेश आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवादही साधला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर या कार्यक्रमाला उपस्थित होते.