आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन २चा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग असलेल्या 'फिट इंडिया फ्रीडम रन टू' ला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडिअम इथून आजपासून सुरवात झाली. त्याच बरोबर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया आणि भारतभरातल्या महत्त्वाच्या इतर ९ स्थानांपासून सुरु होणाऱ्या या उपक्रमात एनएसजीचे ३६ कमांडो सहभागी झाली होते. तसंच निवडक मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नेहरु युवा केंद्र संघटनेतर्फे राज्यातल्या विविध ऐतिहासिक स्थळांवरून देखील फ्रीडम रनचं आयोजन झालं. मुंबईत महात्मा गांधी यांनी १९४२ ला ‘भारत छोडो’चा नारा ज्या ठिकाणाहून दिला होता त्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून पहिली फ्रीडम रन रवाना झाली. त्यानंतर सर्व सहभागी मान्यवरांनी देशरक्षणाची शपथ घेतली.

गेट वे आँफ इंडियापासून मुंबई उच्च न्यायालय मार्गे नरिमन पाईंटवरून सर्व सहभागी मान्यवर आँगस्ट क्रांती मैदानापर्यंत धावले. आणि याच मार्गाने ते परत गेट वे आँफ इंडियाला पोहचले, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. ७५ गावं आणि ७५ जिल्ह्यांमधे येत्या २ ऑक्टोबर पर्यंत फीट इंडीया फ्रीडम रनचं आयोजन केलं जाणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी फीट इंडिया फ्रीडम रन काढली गेली. या आयोजनांदरम्यान सहभागींनी दररोज व्यायाम करायचा संकल्पही केला.

रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यात आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जन्मभूमी असलेल्या शिरढोण इथूनही फिट इंडिया फ्रीडम रन निघाली. नेहरू युवा केंद्र रायगड, रुरल अँड यंग फाऊंडेशन आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी यांनी संयुक्तपणे या रनचं आयोजन केलं होतं.

पुण्यात नेहरू युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर यांनी गोखले इन्स्टिट्यूट इथे आयोजित केलेल्या रनला हिरवा झेंडा दाखवला.

गोंदियात सडक अर्जुनी तालुक्यातल्या कणेरी गावात स्वातंत्र्य सैनिक कन्यालालबापू दीक्षित यांचा निवासस्थानाहून फिट इंडिया फ्रिडम रन काढली गेली. यावेळी दिक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पांजलीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. कन्यालाल यांचे पुत्र रामदत्त कन्यालाल दीक्षित यांनी रन ला हिरवा झेंडा दाखवला.

अकोल्यात नेहरू युवा केंद्र आणि सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयानं संयुक्तपणे फिट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन केलं होतं. या मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या ७५ गावांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत स्वछता पंधरवाडा तसंच कोरोना जनजागृतीविषयक उपक्रमही राबवले जाणार आहेत.

वर्ध्यामध्ये आयोजित फिट इंडिया फ्रीडम रनला खासदार रामदास तडस यांनी हिरवा झेंडा दाखवला. हुतात्मा स्मारक ते सेवाग्राम आश्रम बापु कुटी सेवाग्राम आश्रम पर्यंत या रनचं आयोजन केलं होतं. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

वाशीम इथूनही आज फिट इंडिया फ्रीडम रन निघाली. यावेळी वाशिम नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी शारीरिक तंदुरुस्तीची शपथही घेतली.