इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर तिसऱ्या कसोटी विजयाची नोंद करत इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमान इंग्लंडच्या फलंदाजांना अवघ्या १२० धावांमध्ये तंबूत पाठवले आणि सामना जिंकला. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ तर मोहम्मद शमीने एक बळी घेतला. या विजयासोबतच क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यात विजय मिळवणारा विराट कोहली हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ही कामगिरी केली आहे. या विजयामुळे भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.