संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत आजच्या कामाला सुरुवात होताच कॉंग्रेस, तृणमूल आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्याने कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच वातावरण पाहायला मिळालं. कामकाज सुरू झाल्यानंतर कृषी कायदे, पेगासस हेरगिरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं वारंवार तहकूब करावं लागलं. सध्या दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदकाची कमाई करणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचं संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन करण्यात आलं.