सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा संपन्न

 

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी समिती सचिव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहरचे एन. व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) मिलिंद सोबले, सह जिल्हा निबंधक, पुणे, जी. एस. कोळेकर, प्रविण देशपांडे, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड म.न.पा. हे सदस्य तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे उपनिबंधक 1 ते 6 उपस्थित होते.

या सभेमध्ये पुणे शहरातील एकूण नोंदणीकृत सहकारी संस्था त्यापैकी मानीव अभिहस्तांतरण झालेल्या गृहनिर्माण संस्था याबाबतची माहिती दिली.

मानीव अभिहस्तांतरण योजनेस गती देणेकामी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या शासनाच्या विविध विभागांचे समन्वयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांची अभिहस्तांतरण प्रक्रिया वेळेत व सुलभ होण्याबाबत तसेच सदर प्रक्रियेमध्ये अडीअडचणी सोडविण्याबाबत समिती सचिव व समितीचे उपस्थित सर्व सदस्य यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.

या सभेत दिनांक 22 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अंमलबजावणी करीता निश्चित केल्याप्रमाणे, प्रस्ताव मिळाल्यानंतर नोटीस काढल्यापासून जिल्हा उपनिबंधक यांनी 6 महिन्यात, मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी अभिनिर्णय 30 दिवसांच्या आत, दुय्यम निबंधक यांनी दस्ताची नोंदणी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या कलम 88 प्रमाणे प्रमाणपत्रावरुन व संस्थेने दाखल केलेल्या दस्तावरुन एक दिवसाचे कालमर्यादेत, आणि नगर भूमापन अधिकारी तथा तलाठी / मंडल अधिकारी यांनी मालमत्ता पत्रक अथवा 7/12 उता-यावर संबंधित संस्थेची नांव नोंदणी तात्काळ करणे इत्यादीबाबत अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी तथा गृहनिर्माण संस्था मानीव अभिहस्तांतरण नियंत्रण समिती अध्यक्ष यांनी दिल्या.