टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे.

अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६ गुणांनी जागतिक क्रमवारीतील बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कथुनियानं थाळी फेक प्रकारांत ४४ पूर्णांक ३८ मीटरचा पल्ला गाठत रौप्य पदक पटकावलं आहे. तर देवेंद्र झान्झरीया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटरचा पल्ला गाठत भालाफेक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. हे त्याचं या स्पर्धेतील आत्तापर्यंतच तिसरं पदक आहे. तर सुंदर याने या सत्रातील ६२ पूर्णांक ५८ मीटर अशी सर्वोत्कृष्ट फेक नोंदवत कास्य पदक पटकावलं. 

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी योगेश कथुनिया याचंही रौप्यपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. पॅराऑलीम्पिक्स स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या योगेशनं पदार्पणातच रौप्य पदक जिंकून भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. त्याला खेळताना बघणं हा एक थरारक क्षण असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुवर्णपदक विजेत्या अवनीचं प्रत्यक्ष दूरध्वनी करून तसंच ट्विटरवरूनही अभिनंदन केलं. हा क्षण भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी बहुमोल क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.अवनीचं यश ऐतिहासिक असल्याचं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अवनीसह इतर पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंनी पदकं जिंकत देशाची मान उंचावली असं पवार यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनीही पदकविजेच्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. बॅडमिंटन, तिरंदाजी आणि नेमबाजीत भारताला आणखी पदकं मिळतील असा विश्वास त्यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला. भारतीय क्रीडा प्राधिकरणानं केलेलं सहकार्य आणि केंद्र सरकारनं ऑलिम्पिक पोडियमसारख्या योजनांसह राबवलेल्या इतर उपक्रमांमुळेच भारताचे खेळाडू ऐतिहासिक कामगिरी करू शकले असं दीपा मलिक यांनी म्हटलं आहे.