तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्राणवायूचे उत्पादन वाढवण्यावर भर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायूच्या टंचाईमुळं विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये अशी कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्हा प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, महाराष्ट्र हे देशातील प्राणवायू बाबतीत स्वयंपूर्ण होणारं पहिलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथल्या प्राणवायू प्रकल्पाचं ठाकरे यांच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीमार्फत लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकानं आपलं गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.