लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह आणि इतरांना श्रद्धांजली वाहून या सत्रात झालेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. या सत्रात वीस महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या सत्रातही रात्री उशिरापर्यंत कामकाज चालवण्याचा विचार होता, मात्र गदारोळामुळे ते शक्य झालं नाही असं त्यांनी सांगितलं. सभागृहात कामकाज होणं ही जनतेची अपेक्षा असते त्यामुळे घोषणाबाजी आणि गोंधळ करणं या गोष्टी योग्य नाहीत, असं ते पुढे म्हणाले. राज्यसभेतही आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ सुरू राहिला. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काल विरोधी पक्षांनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली. या वेळी ते भावुकही झाले. त्यानंतर विरोधी पक्षांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यांनी बारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सध्या इतर मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देणाऱ्या घटनेतल्या १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.