कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची १ हजार ३६७ कोटी रुपयांची तरत तरतूद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनानं १ हजार ३६७ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ही माहिती दिली. यात केंद्राचा वाटा ८२० कोटी ७७ लाख रुपये, तर राज्य शासनाचा वाटा ५४७ कोटी १८ लाख रुपयांचा आहे.

कोविड प्रतिबंधासाठी केलेल्या या विशेष तरतुदीमुळे, अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखल्या जाणार आहेत, असं यड्रावकर यांनी सांगितलं. कुशल-अकुशल मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधं, यंत्रसामुग्री, कोविड चाचणीसाठी आवश्यक किट्स, लहान मुलं आणि नवजात शिशुंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, पहिल्या दोन लाटांमध्ये आलेल्या अनुभवांच्या आधारे अधिकच्या उपाययोजना राज्य शासन करत आहे. जनतेनंही कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून स्वतःचं आणि कुटुंबियांचं रक्षण करावं, राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असं आवाहन यड्रावकर यांनी केलं आहे.