कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण झाला आहे. सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा अप-लाईन मार्गाचा १ हजार ११७ मीटरपेक्षा जास्त लांबीचा भुयारीकरणाचा टप्पा २५७ दिवसात पूर्ण केल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले. मेट्रो-३ मार्गिकेतल्या पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतला सर्वात लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत मेट्रो-३ प्रकल्पाचे साडे शहाण्णव टक्के, म्हणजे ५२ किलोमीटर पेक्षा जास्त भुयारीकरण पूर्ण झाले आहे.