आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच कौशल्य संवर्धनावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास ही आजमितीला संपूर्ण देशाची महत्त्वाची गरज असून आत्मनिर्भर भारताचा तो सर्वात भक्कम असा पाया आहे. त्यामुळं आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच अपस्कीलिंग आणि रीस्कीलिंग यावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्व युवा कौशल्य दिन आणि स्किल इंडिया उपक्रमाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या तरुणांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे ही यामध्ये सहभागी झाले होते. समाजातील तरुणांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीय केलं तर त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. म्हणूनच गेल्या सहा वर्षातील आणि अगदी अलीकडची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन नव्या प्रेरणेसहित कुशल भारत अभियानाला गती देण्याची गरज आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

आगामी पिढ्यांच्या स्कीलिंग, रीस्कीलिंग आणि अपस्कीलिंग वर सरकार काम करीत असून त्याद्वारे आपण संपूर्ण जगाला विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवू शकू. असं कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळेच सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात आपण भक्कमपणे त्याला तोंड देऊ शकलो, असंही मोदी यांनी नमूद केलं.