१६ हजार पूरग्रस्त कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागात आलेल्या पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट १६ हजार किट्सचं वाटप करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.

राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. एकूण १६ हजार कुटुंबांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना ही मदत दिली जाणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट पूरग्रस्तांना मास्क पुरवणार असून पुरामुळे आजारी पडलेल्यांवर औषधोपचार करण्यासाठी २५० डॉक्टरांचं पथकही पाठवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. दौरे केल्यानं यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.