कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल- सर्वोच्च न्यायालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं ही रक्कम येत्या सहा आठवड्यात निश्चित करण्याचं प्राधिकरणाला सांगितलं आहे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये भरपाई रक्कम देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे, त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यामुळे यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.