भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता - सुनीत शर्मा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता असं भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे तंत्रज्ञानाधारित बनवणं, यंत्रणांचं आधुनिकीकरण करणं आणि प्रवाशांना अधिकाधिक सुखकारक अनुभव देणं हे मंडळाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. गांधी नगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हे रेल्वे स्थानकं पुनर्विकास उपक्रमातलं पहिलं पाऊल असल्याचं ते म्हणाले. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन बाळगत, मालवाहतूक हिस्सा वाढविणं यावरही मंडळानं लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेनं किसान रेल्वे सेवेच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांचा शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवला, २०२० -२१ या वर्षात देशभरातल्या ६ हजार ४० स्थानकांवर वायफायची सेवा स्थापित केली, तसंच १५६ उद्वाहनं आणि १२० स्वयंचलित जीने बसवली अशी माहिती त्यांनी दिली.