पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं संतत्प जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं, संतत्प जमावानं काल रात्री दारव्हा पोलीस ठाणं आणि पोलीसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवून, जमाव पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गांजा विक्री करत असल्याच्या संशयावरून पोलीसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं. मात्र या तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर, तिथे त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी केलेल्या मारहाणीमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला आहे.