मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी 

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या अनेक भागांमध्ये उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या जिल्ह्यांसाठी उद्याकरता रेड अॅलर्ट जारी केला आहे.मुंबईत आज सकाळनंतर काही काळ पावसानं उसंत घेतली होती. त्यानंतर मात्र अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल रात्रीपासून आज पहाटे ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. सर्वाधिक, २२६ पूर्णांक ८२ शतांश मिलिमीटर इतका पाऊस हा 'आर उत्तर' विभागात दहिसर अग्निशमन केंद्र इथं असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवला आहे. चेंबूर, विक्रोळी पश्चिम, कांदिवली, मरोळ, बोरिवली, महापालिका मुख्यालय, आणि 'जी वरळी इथं २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.