कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय आणि खासगी कृषी महाविद्यालयांमधल्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातल्या ३८ शासकीय, आणि १५१ विनाअनुदानित, अशा एकुण १८९ महाविद्यालयांमधल्या ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयही कृषीमंत्र्यांनी घेतला आहे. याबाबत आज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली. विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परीक्षेचा अर्ज अडवे नये. विद्यार्थ्यांचन शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्याबाबीसाठी आकारलं जाणारं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.