रेणापूर सुधा जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यास मान्यता – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

  रेणापूर सुधा जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यास मान्यता – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सुधा नदीवरील रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन प्रकल्पाची 1.10 मीटर उंची वाढविण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे 2.050 क्युबिक मीटर पाणीसाठा वाढणार असून आणखी 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

गोदावरी खोऱ्याच्या सुधा सुवर्णा उपखोऱ्यात भोकर तालुक्यातील रेणापूर गावाजवळ सुधा नदीवर रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून परिसरातील पाण्याची गरज भागविली जाते. भोकर नगरपंचायतीकडून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी वाढल्याने सिंचनासाठी पाणीसाठा अपुरा पडत होता. नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पाणीसाठा वाढविण्यासाठी या जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे, विस्तार व सुधारणेसंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठवला होता.

या प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे या प्रकल्पाच्या एकूण पाणीसाठ्यात 7.947 क्युबिक मीटर वरून 9.997 क्युबिक मीटर इतकी वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 10.41 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.