मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला मिळाला ३० कोटी ८० लाखांचा महसूल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला आतापर्यंत ३० कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला असल्याची माहिती आज सरकारने राज्यसभेत दिली.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं की २०१४ मधे हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून २०१७-१८ या वर्षात १० कोटी ६४ लाख रुपयांची विक्रमी कमाई झाली आहे. तथापि या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट सरकारच्या दैनंदिन कामकाजाविषयी जनतेशी संवाद साधण्याचे आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.या कार्यक्रमाद्वारे जनतेलाही सूचना आणि आणि योगदान देण्याची संधी मिळते असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून २०१८ ते २०२० या काळात ६ कोटी ते १४ कोटी ३५ लाख श्रोत्यांनी तो ऐकल्याचं प्रसारण श्रोतृवर्ग संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसून आलं आहे. एकूण २३ भाषा आणि २९ बोलींमधे आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम प्रसारित होतो. दूरदर्शनच्या विविध वाहिन्या तसंच खासगी दूरचित्रवाहिन्या त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध माध्यम मंचांवर मन की बात कार्यक्रम उपलब्ध असतो.