राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज चर्चा होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर सीईटी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यासाठी प्रशासनाची तयारी असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यात बारावीच्या परीक्षेसंदर्भात सखोल अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

राज्यातल्या बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा यंदा कोविड पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सीबीएसई पाठोपाठ ICSE ने ही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.