रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यानंतर यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ टक्के राहणार आहे, असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले.

बुधवारपासून बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू झाली होती. चालू आर्थिक वर्षात विकास दर साडे नऊ टक्के राहण्याचा अंदाजही बँकेने वर्तवला आहे. या वर्षात किरकोळ महागाई दर ५ पूर्णांक १ टक्के राहील असंही रिझर्व्ह बँकेचे म्हणणं आहे.

रिझर्व्ह बँकेकडून गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात सरकारी रोख्यांची खरेदी करण्यात येत आहे. यापुढेही ही पद्धत कायम राहणार आहे. १७ जून रोजी ४० हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी केले जाणार आहेत.

तर पुढच्या तिमाहीत बाजाराला भांडवल देण्यासाठी आणखी १ लाख २० हजार कोटींचे रोखे खरेदी केले जाणार असल्याचं गव्हर्नरांनी जाहीर केलं.