शिवस्वराज्य दिन राज्यभरात उत्साहात साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. त्यानुसार आज राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन केलं.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं. जनतेच्या मनातलं आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं.

तुतारीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात आज अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात आज शिवस्वराज्य दिनाचा मुख्य सोहळा साजरा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि प्रशासन चालवताना आपल्यामध्ये आपण जनतेसाठी आहोत, ही भावना कायम राहावी यासाठी या शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे औचित्य आहे. त्यामुळेच लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावं, असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.

धुळे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत आज शिवस्वराज्य दिनानिमित्त उत्साहात साजरा झाला. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज विशेष कार्यक्रम झाला. यात पालकमंत्री आमदार सत्तार पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी शिवस्वराज्य गुढीचे पूजन कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या हस्ते झालं.

नंदुरबार इथं क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवछत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याला पंचामृताचा विधिवत अभिषेक करुन करुन शिवप्रेमींनी अभिवादन केल.

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन महापालिका प्रशासकीय इमारतीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम आणि महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून गुढी उभारली.

शिवस्वराज्य दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून पुजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरच राज्य शासनाचे काम सुरु असल्याचं  बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं.

परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिवस्वराज्य दिन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून केशरी ध्वज फडकवण्यात आला तसंच शिवकालीन तुतारी वाजवून महाराजांना अभिवादन करण्यात आले.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.