पश्चिम आफ्रिकी देश, मालीमधील लष्करी बंडाळीनंतर आफ्रिकी संघाद्वारे त्या देशाचं सदस्यत्व प्रलंबित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माली देशात गेल्या आठवड्यात झालेल्या लष्करी बंडानंतर आफ्रिका महासंघानं मालीचं सदस्यत्व तात्पुरतं रद्द केलं आहे. नागरी नेतृत्वाखालील सरकारची पुनर्स्थापना झाली नाही, तर निर्बंध लादले जातील असा इशाराही महासंघानं दिला आहे. 

मालीमध्ये नागरी नेतृत्वाखालील पारदर्शी, बंधनमुक्त सरकार येणं आवश्यक आहे. अन्यथा कडक निर्बंध लादायला मागंपुढं बघितलं जाणार नाही असं आफ्रिका महासंघाच्या शांतता आणि सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मालीमध्ये झालेल्या बंडामुळे फेब्रुवारीतल्या अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकते असं मालीच्या शेजारी देशांचं आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायाचं म्हणणं आहे. मालीमध्ये इस्लामी दहशतवाद्यांविरुद्धचा संघर्ष जोर धरू शकतो असंही म्हटलं जात आहे.