रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ

  रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२/०२/२०२१ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला व या भाडेवाढीकरिता ऑटोरिक्षा/टॅक्सी यांचे मिटर रिकॅलिब्रेशन करणेकरिता ३१ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती व तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशनचे कामकाज १५ एप्रिल २०२१ पासून होऊ न शकल्याने ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ३१ मे २०२१ रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.

तरी सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक/चालक यांनी ब्रेक द चेन अंतर्गत शासनाच्या निर्णयाशी अधीन राहून विहित कालावधीमध्ये ऑटोरिक्षा व टॅक्सी मीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.