अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र स्वरुपाचं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गेल्या सहा तासापासून ते १३ किलोमीटर प्रतितास वेगानं गुजरातच्या दिशेनं सरकत असून, ते साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईच्या किनारपट्टीपासून १६५ किलोमीटरवर होतं असं मुंबई हवामान विभागानं कळवलं आहे. हे चक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, या कालावधी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळी हा वेग मुंबईत ताशी ११४ किलोमीटरपर्यंत नोंदवण्यात आला होता. आतापर्यंतचा कुठल्याही चक्रीवादळात मुंबईत एवढ्या वेगाने वारे नोंदवण्यात आले नव्हते. रात्री १० वाजेनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर वादळाच्या प्रभावानं मुंबईत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.