६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.
सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे.
गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.