प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अधिक चाचण्या करण्यावर दिलेला भर, स्थानिक प्रतिबंधित क्षेत्रांचं नियोजन आणि नागरिकांपर्यंत पूर्ण आणि योग्य माहिती पोचवणं ही कोरोना विरोधातल्या लढ्यातली प्रमुख शस्त्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

देशभरातल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष काम करत असलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांशी त्यांच्या अनुभवाबद्दल आज प्रधानमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाविरोधातल्या लढ्यातल्या चांगल्या प्रयत्नांचं देशभरात अनुकरण करता यावं यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात असं आवाहन त्यांनी केलं

अनेक अधिकाऱ्यांना स्वतः कोरोना संक्रमीत झाल्यानंतर, तसंच या आजारानं स्वतःचे नातेवाईक गमावल्यानंतरही नागरिकांची सेवा केल्याची दखल प्रधानमंत्र्यांनी या संवादात घेतली.

देशाच्या प्रत्येक भागातल्या समस्यांचं स्वरुप वेगळं असल्यानं, वेगवेगळ्या उपायांची गरज आहे, मात्र अशाही स्थितीत सगळ्यांनी कार्यक्षमपणे समस्या सोडवल्या, ग्रामीण भागात योग्य व्यस्थापन केलं याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. या संपूर्ण लढ्यात जिल्हा अधिकारी हे फील्ड कमांडर असल्याचं ते म्हणाले. औषधं आणि आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठेबाजांविरूद्ध त्वरेंनं काम करायला हवं हे त्यांनी अधोरेखित केलं.

संसर्ग रोखण्यासाठी नव्या रणनीतींना केंद्र सरकार नेहमीच पाठिंबा देईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोविड प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना लोकांना तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यं आणि जिल्ह्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा योग्य वापर करावा आणि त्यावर देखरेख ठेवावी असं सांगतानाच, पीएमकेअरएसकडून दिलेल्या निधीचा वापर करून ऑक्सिजन प्रकल्प उभारायचं काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. लसींचा योग्य पुरवठा होण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व पातळ्यांवरचे प्रयत्न सुरु आहेत, तर त्याचवेळी लस वाया जाण्याचं प्रमाणही कमी करायला हवं असं त्यांनी सांगितलं.