नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

देशातील विद्यापीठांच्या संघटनेच्या ९५ व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला त्यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत प्रतिभेला संस्थात्मक पाठबळ मिळालं तर त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत मिळेल; याच हेतूनं विद्यार्थी आणि शिक्षण संस्था या दोन्ही घटकांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे; असं मोदी म्हणाले.

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करताना कुशल युवा शक्तीची ऊर्जा महत्त्वपूर्ण ठरणार आहे; म्हणूनच कौशल्य विकासावर भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत; किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं.

अहमदाबाद मुक्त विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.