नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मालधक्का इथं प्राणवायू घेऊन 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आज नाशिक जिल्ह्याला विशाखापट्टणम इथून आलेल्या 'ऑक्सिजन एक्सप्रेस' च्या माध्यमातून २५ किलोलिटरचे दोन टँकर प्राप्त झाले आहेत. देवळाली मालधक्का इथं ही 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला गरजेनुसार ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी ५६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता, त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करणे बंद केले होते. मात्र आज ऑक्सिजन पुरवठा झाल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनची असलेली गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारा साठा यातील तफावत उद्या येणाऱ्या अधिकच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार असल्याचं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलं आहे.