कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.  राज्यातली कोविड परिस्थिती आणि उपाययोजना या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते आणि  मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी काल ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल  मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनानं आपल्यावर लादलेली असून, लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावलं उचलावी लागतील, तसंच या औषधाचा अतिरेकही थांबावावा लागेल. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या सुचना मांडल्या.