१८ वर्षांवरील लसीकण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले प्रधानमंत्र्यांचे आभार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या १८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

देशात २५ वर्षांपुढच्या सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी यांना केली होती. त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि यासाठी लसीचा पुरवठा वेळच्यावेळी होत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या निर्णयाचं स्वागत करून आभार मानले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी आभार मानले आहेत.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातली लोकसंख्या अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गानं आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवावा, आणि लसीकरण करून घ्यावे, असं आवाहनही टोपे यांनी केले आहे. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितले.