महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल महाराष्ट्रानं दीड कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. याबद्दल आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचं राज्यानं उद्दिष्ट ठेवलं असून, त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

राज्यातल्या नागरिकांसाठी लसींच्या १२ कोटी मात्रा खरेदी करायची सरकारची तयारी आहे, मात्र लसीच्या मात्रांची उपलब्धता हे मोठं आव्हान असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

लसींसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तो करायची राज्याची तयारी आहे. त्या दृष्टीनं सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना लशीच्या मुबलक मात्रा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी पत्र पाठवलं आहे.

राज्यात लसींचा साठा मर्यादित असल्यानं येत्या १ तारखेपासून लसीकरण केंद्रावर घाई करून गर्दी करू नये, नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल, असं आवाहन त्यांनी केलं.

नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवलं जातं. ही संकल्पना यशस्वी झाल्याचं दिसत आहे, त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा, असं टोपे यानी सांगितलं.

ऑक्सिजन, रेमडीसीवीर उलब्धतेसाठी राज्य सरकारनं जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पीएसए, २७ ऑक्सिजन टँक, २५ हजार मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन आणि १० लाख रेमडीसीवीरच्या कुप्या या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे, असं त्यानी सांगितलं.